
अहिल्यानगरच्या बुऱ्हाणनगरमध्ये पुढील एका वर्षात क्रीडा संकुल उभारण्याचा मानस आमदार अक्षय कर्डीले यांनी व्यक्त केला आहे. या संकुलात खो-खो, कुस्ती, क्रिकेटसह विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
तालुका आणि जिल्हास्तरीय स्पर्धांसोबतच ग्रामीण भागातील खेळाडूंना नियमित सरावासाठीही या संकुलाचा फायदा होणार आहे.
बुऱ्हाणनगर येथील बानेश्वर विद्यालयात १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या
स्पर्धेत तब्बल ४७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राची मोठी क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, सराव आणि स्पर्धांची संधी मिळाल्यास हे खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकू शकतात, असा विश्वास कर्डीले यांनी व्यक्त केला.
तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे यांनी स्वतंत्र क्रीडा संकुलाची मागणी केली होती. त्यानुसार या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे.





