
धीरज परदेशी हत्याकांड प्रकरणानंतर नागरी सुविधा बंद झाल्याची तक्रार थेट आयोगाकडे पोहोचली… पण प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा चित्र वेगळंच समोर आलं!
मंडळी, नागरी सुविधा बंद नव्हत्या, तर प्रशासनाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी केला आहे. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागात नागरिकांना पाणी, स्वच्छता किंवा इतर नागरी सुविधा मिळत नसल्याची तक्रार आयोगाकडे आली होती. त्यानंतर खान यांनी स्वतः परिसराची पाहणी केली.
नगरसेवक आणि नागरिकांशी संवाद साधल्यानंतर अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, अल्पसंख्याक समाजाच्या विविध तक्रारींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
नाशिक कारागृहाच्या भेटीदरम्यान आबू सालेमनेही शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा करत सुटकेची मागणी केली. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आयोग हस्तक्षेप करू शकत नसल्याचे खान यांनी स्पष्ट केले. मॉडर्न मदरशांमधून मराठी, हिंदी, इंग्रजीसह आधुनिक शिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार आहे.





