
नेवासा तालुक्यातील खरवंडी गावातून एक अतिशय संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका ५० वर्षीय नराधमाने भोळसर अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या मित्रांना पैसे व खाऊचे आमिष दाखवून शेतातील कोपीमध्ये बोलावले आणि त्याचे लैंगिक शोषण केले.
एवढेच नव्हे तर, या घृणास्पद कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली.
या प्रकरणी पीडित मुलाच्या फिर्यादीवरून आरोपी नुर्खा बाबुलाल शेख याच्या विरोधात बीएनएस कलम ३५१(३) सह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक धनवटे व उपनिरीक्षक गिरीशकुमार केदार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ खरवंडी गाव कडक बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला असून, गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.





