
अहिल्यानगर–दौंड महामार्गावरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या धक्कादायक प्रकारावर अखेर प्रशासनाने मोठा बडगा उगारला आहे ! श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील आम्रपाली लॉज अँड बारमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याचे पोलिस तपासात समोर आल्यानंतर संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांच्या प्रस्तावानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. तपासात महिलांना येथे राहण्याची व्यवस्था करून ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात देहव्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात सात पीडित महिलांची नोंद असून, हॉटेलशी संबंधित अनेक आरोपींसह एका ग्राहकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनावणीची संधी देऊनही संबंधित गैरहजर राहिल्याने प्रशासनाने कठोर निर्णय घेतला.
आता या हॉटेलवर बंदी लागू करण्यात आली असून, भविष्यात पुन्हा अशा बेकायदेशीर कृत्यांसाठी जागेचा वापर झाल्यास त्याची जबाबदारी मालकावरच राहणार असल्याचा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.





