
अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात गांधी जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी थरारक घटना घडली. आई-वडिलांना कामात मदत करण्यासाठी नववीतील सिद्धांत रमेश तळेकर शेळ्या चारण्यासाठी रानात गेला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एका शेळीवर झडप घातली.
क्षणभर परिस्थिती गंभीर झाली, मात्र सिद्धांत घाबरला नाही. त्याने थेट बिबट्याच्या दिशेने धाव घेत जोरजोरात आरडाओरडा केला आणि त्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. तब्बल पाच ते सहा मिनिटे बिबट्या आणि सिद्धांत यांच्यात झुंज सुरू होती.
अखेर विद्यार्थ्याच्या आक्रमक पवित्र्यापुढे बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र, या धाडसी प्रयत्नानंतरही शेळीचा जीव वाचू शकला नाही. गंभीर जखमी झालेली शेळी काही वेळातच दगावली.
दरम्यान, परिसरात बिबट्यांचा वाढता वावर पाहता वनविभागाकडून पिंजरा लावण्याची तयारी सुरू आहे. मात्र, ग्रामस्थांचा सवाल एक —पाळीव प्राणीच नव्हे, तर लहान मुलांवरही धोका असेल तर हा बिबट्यांचा धसका कायमचा कधी टळणार?





