
तब्बल १० लाख भाविक… ७०० पोती मुरमुरे… २० क्विंटल शेंगदाणे… आणि काला तयार करण्यासाठी चक्क काँक्रीट मिक्सर ! राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सराला बेट येथील गंगागिरी महाराजांचा १७९वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.
१८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सप्ताहात शनिवारी तब्बल ४ लाख भाविकांनी हजेरी लावली. २५ ऑगस्टला होणाऱ्या काल्याच्या महाप्रसादासाठी १० लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. दररोज ४० गोणी मुरमुरे, २० क्विंटल शेंगदाणे, १० क्विंटल मसाले, २ क्रेट कढीपत्ता, १ घमेले खारी बुंदी आणि १० बादल्या गोडतेल वापरले जात आहे.
संपूर्ण सप्ताहासाठी ७०० पोती मुरमुरे, ४० क्विंटल शेव, ४५० क्विंटल बुंदी, २०० क्विंटल साबुदाणा आणि १०० क्विंटल राजगिरा लागणार आहे. महाप्रसादासाठी दररोज तब्बल ५ लाख लिटर आमटी तयार केली जाते. यासाठी ४०० मजूर १० ते १२ तास काम करत आहेत.
२,५०० लिटरच्या ३ कढाया आणि एकूण ३५ कढायांतून आमटी तयार करून टँकरद्वारे भाविकांपर्यंत पोहोचवली जाते. श्रद्धेचा हा महाकुंभ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!





