
शासनाच्या महाभूमी या संकेतस्थळावरुन तुमचा सातबारा व आठ अ उतारा थेट तुमच्या व्हाट्स्अँपवर दिला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना अगदी माफक शुल्कात नोंदणी करता येणार आहे. सुरुवातीला ही सुविधा प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करण्यात येणार असून, त्यानंतर ती टप्याटप्प्यात उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातबारा व इतर उतारे हे फक्त 15 रुपये शुल्कात दिले जात होते. परंतु ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना थेट सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रात जावे लागत होते. त्यात काही सेतूचालक शेतकऱ्यांकडून जादा पैसेही घेत होते. परंतु आता महाभूमी या संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक टाकल्यास थेट त्या क्रमांकाच्या व्हाट्सअॅपला शेतकऱ्यांना उतारा दिला जाणार आहे.
आता या सुविधेत सात बारा उतारा, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखला, जात प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, ई रेकाँर्ड्स, तसेच इतर आवश्यक दाखलेही व्हाट्सअॅपवर मिळणार असल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले. ही सेवा डिजीटल इंडिया या मोहिमेला चालना देणारी असल्याचे सांगितले जात आहे.





