
लाडकी बहीण योजनेला दोन वर्षे पूर्ण होत असताना लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. राज्यात सुरुवातीला सुमारे २ कोटी ४८ लाख महिला लाभ घेत होत्या. मात्र पडताळणीनंतर ही संख्या १ कोटी ६५ लाखांपर्यंत आल्याचे माहिती अधिकारातून समोर आलं आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरुवातीला ११ लाख २६ हजार ६५२ महिला लाभार्थी होत्या. राज्यातील अपात्रतेचे प्रमाण ४० टक्के गृहीत धरल्यास जिल्ह्यात साडेचार लाखांहून अधिक महिला अपात्र ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र जिल्हानिहाय सध्याची अधिकृत आकडेवारी पोर्टलवर उपलब्ध नसल्याने हा आकडा निश्चित मानता येत नाही. ई-केवायसी अपूर्ण असणे, उत्पन्न मर्यादा ओलांडणे, सरकारी नोकरी, इतर योजनांचा लाभ, वयोमर्यादा आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी अशी अपात्रतेची कारणे आहेत. लाभ बंद झाला असल्यास आधारकार्डच्या आधारे कारणाची माहिती संबंधित विभागाकडून घेता येते.





