
इयत्ता अकरावीचे प्रवेश यावर्षीही केंद्रीय व ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येणार आहेत. फार्म-1 व फार्म-2 भरून हे प्रवेश केले जाणार आहे. फार्म-1 भरण्याची सुविधा त्या-त्या महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याच्या सुचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. दहावीचा निकाल लागल्यावर फार्म-2 भरता येणार आहे.
या प्रवेशासाठी दहावीचे मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, नाँन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, अर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे प्रमाणपत्र, दिव्यांगासाठी दिव्यांग प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागणार आहेत.
हा प्रवेश तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीभूत प्रवेश, संस्थांतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोटा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी घटनात्मक व समांतर आरक्षणही लागू करण्यात आले आहे.
राखीव प्रवर्गाचे विद्यार्थी न मिळाल्यास खुल्या प्रवर्गांना आरक्षण कोट्यातून जागा मिळणार आहे. शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसार व निकषांनुसारच करण्यात येईल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अन्य कोणत्याही पद्धतीने शाळांना प्रवेश प्रक्रिया राबवता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.





