
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. एकेकाळी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळांवर आता कुलूप लागण्याची वेळ आली आहे. गेल्या अवघ्या नऊ वर्षांत तब्बल ७५ जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या आहेत.
मंडळी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे सर्वात मोठे माध्यम म्हणजे जिल्हा परिषद शाळा. पण गेल्या काही वर्षांपासून या शाळांमधील विद्यार्थी संख्या सातत्याने कमी होत आहे. पटसंख्या घटल्यामुळे शासनाला या शाळा बंद करून त्यांचे समायोजन इतर शाळांमध्ये करावे लागत आहे.
या परिस्थितीमागे रोजगारासाठी पालकांचे स्थलांतर, घटता जन्मदर, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता कल, शिक्षकांवरील शालाबाह्य कामांचा भार, विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण नसणे, पालकांचे दुर्लक्ष आणि काही ठिकाणी अध्यापनातील त्रुटी ही प्रमुख कारणे मानली जात आहेत.
आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक १७ शाळा कर्जत तालुक्यात बंद झाल्या आहेत. त्यानंतर नगर तालुक्यात १०, तर जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदे या तालुक्यांमध्ये प्रत्येकी ८ शाळांना कुलूप लागले आहे.
मंडळी, ग्रामीण शिक्षण व्यवस्था टिकवायची असेल, तर विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक आणि पालक या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.





