Latest

अबब ! एक, दोन नव्हे; अहिल्यानगरमधील ‘या’ गावात आले ११ बिबटे, नुसता धुमाकूळ

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील देवगाव परिसरात एक-दोन नाही, तर तब्बल ११ बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून त्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय. केवळ एका आठवड्यात जवळपास १५ शेळ्यांचा फडशा पाडण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ प्रचंड घाबरले आहेत.

देवगाव आणि भेंडा शिवारात बिबट्यांच्या दोन टोळ्या फिरत असल्याचं अनेकांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे. एका टोळीत नर, मादी आणि तीन बछडे, तर दुसऱ्या टोळीत नर-मादी आणि चार बछडे अशा एकूण ११ बिबट्यांचा या भागात वावर असल्याची माहिती समोर आली आहे.

२० एप्रिल रोजी देवगाव येथील बबन जामदार यांच्या गोठ्यातील सहा शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केलं. याआधीही त्यांच्या पाच शेळ्या बिबट्यांनी खाल्ल्या होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी दगड्डू मोरे यांच्या गोठ्यातील पाच शेळ्या एकाच वेळी ठार करण्यात आल्या.

इतकंच नाही, तर एका ठिकाणी दोन बिबट्यांनी लोकांसमोरच बोकडाची शिकार केली, तर दुसऱ्या बाजूला घराच्या अंगणात असलेला कुत्राही ठार करण्यात आला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे.

वन विभागाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे. मात्र ग्रामस्थांची मागणी आहे की, तात्काळ कारवाई करून बिबट्यांना जेरबंद करावं. यासाठी विविध ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button