
शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. २० जुलैनंतर पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी तो शेतीसाठी फारसा लाभदायक ठरणार नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मंडळी, सध्या मान्सून जवळपास निष्क्रिय झाला आहे. यामागे प्रशांत महासागरात प्रभावी झालेला ‘एल निनो’ आणि अफगाणिस्तानातून भारताच्या दिशेने वाहणारे कोरडे वारे ही दोन प्रमुख कारणे असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे.
हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांच्या माहितीनुसार, आजपासून पुढील रविवार-सोमवारपर्यंत राज्यात कुठेही जोरदार पावसाची शक्यता नाही. बुधवारी आणि गुरुवारी काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो, मात्र त्यातून शेतीला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या बहुतांश भागांत पावसाचा जोर कमीच राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील परिस्थिती अधिक चिंताजनक बनत आहे. जुलैचा दुसरा आठवडा संपत आला तरी सुमारे ३५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
२० जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ते तयार झाल्यास काही प्रमाणात पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.





