Latest

मान्सून अहिल्यानगरमध्ये कधी येणार? किती टक्के पडणार? हवामानाचा अंदाज आला..

अहिल्यानगरकरांनो, सर्वांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, मान्सून नेमका कधी येणार? आणि यंदा पाऊस किती पडणार? मंडळी, हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांच्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात नियमित नैऋत्य मान्सून 15 ते 20 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.

तोपर्यंत वातावरणात बदल जाणवणार असून ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाच्या सरी अनुभवायला मिळू शकतात. मात्र जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये शेतीसाठी उपयुक्त आणि समाधानकारक मोठ्या पावसाची शक्यता अत्यंत कमी असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे पेरणीसाठी घाई न करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

दरम्यान, पावसाबाबत एक दिलासादायक अंदाजही समोर आला आहे. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी राज्यात यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडेल, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे सुरुवातीला मान्सूनला उशीर होत असला तरी संपूर्ण हंगामात पावसाचे चित्र समाधानकारक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button