
आपण जवळपास रोज टी-शर्ट घालतो, पण कधी विचार केलाय का, टी-शर्टमधील ‘T’ चा नेमका अर्थ काय आहे? आणि हा टी-शर्ट नेमका जन्माला कसा आला? सर्वात आधी जाणून घेऊया, टी-शर्टला टी-शर्टच का म्हणतात? जर तुम्ही टी-शर्ट सपाट पसरवून ठेवला, तर त्याचा आकार इंग्रजीतील ‘T’ या अक्षरासारखा दिसतो. म्हणून त्याला ‘टी-शर्ट’ हे नाव मिळालं.
आज टी-शर्ट फॅशनचा अविभाज्य भाग असला, तरी सुरुवातीला तो फॅशनसाठी नव्हता. खरं तर त्याचा जन्म अंतर्वस्त्र म्हणून झाला होता. 19 व्या शतकात अमेरिकेतील कारखान्यांमध्ये आणि खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांना जाड कपडे घालावे लागत होते.
काम करताना त्यांना उष्णता आणि घामाचा त्रास होत असे. त्यामुळे एका पारंपरिक अंतर्वस्त्राचे दोन भाग करण्यात आले आणि त्यातून टी-शर्टची निर्मिती झाली. यानंतर 1913 मध्ये अमेरिकन नौदलाने टी-शर्टला अधिकृत गणवेशाचा भाग म्हणून मान्यता दिली. घाम पटकन शोषून घेणे आणि लवकर कोरडे होणे, ही त्याची मोठी वैशिष्ट्ये होती.
पण टी-शर्टला खरी लोकप्रियता मिळाली ती हॉलिवूडमुळे. 1951 मध्ये ‘A Streetcar Named Desire’ या चित्रपटात Marlon Brando यांनी टी-शर्ट परिधान केला आणि त्यांचा हा लूक प्रचंड गाजला. त्यानंतर आजपर्यंत फॅशन ट्रेंडमुळे टी-शर्ट जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कपड्यांपैकी एक बनला आहे.





