
मंडळी, जगभरातील संशोधन सांगतं की महिलांचं सरासरी आयुर्मान हे पुरुषांपेक्षा जास्त असतं. हार्वर्ड हेल्थ रिपोर्टनुसार महिलांचे आयुष्य पुरुषांपेक्षा जवळपास ७ वर्षांनी अधिक असू शकते. पण यामागे नेमकं कारण काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊयात.
तर, तज्ज्ञांच्या मते, पुरुष लहानपणापासूनच अधिक जोखमीचे निर्णय घेतात. वेगवान वाहन चालवणे, धोकादायक कामं किंवा हिंसक घटनांमध्ये अडकण्याची शक्यता पुरुषांमध्ये अधिक असते.
याशिवाय कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही पुरुषांवर लवकर येते. सैनिक, बांधकाम, अग्निशमन यांसारख्या धोकादायक नोकऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याने अपघातांचा धोका वाढतो.
आरोग्याच्या बाबतीतही पुरुष अनेकदा दुर्लक्ष करतात. हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि तणावामुळे पुरुषांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक दिसते.
मानसिक आरोग्य हेही मोठं कारण आहे. अनेक पुरुष ताण, डिप्रेशन किंवा समस्या कुणाशी शेअर करत नाहीत. तर महिलांचे सामाजिक संबंध मजबूत असल्याने त्यांना भावनिक आधार मिळतो. म्हणून दीर्घ आयुष्य हवं असेल तर शरीरासोबत मनाचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.





