
काय सांगता ! भारतातील डिजिटल व्यवहारांनी पुन्हा एकदा इतिहास रचलाय. यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने मे महिन्यात व्यवहारांची संख्या आणि मूल्य या दोन्ही बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
किराणा दुकानापासून ते मोठ्या मॉलपर्यंत, चहाच्या टपरीपासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत आणि रिक्षा भाड्यापासून ते वीजबिल भरण्यापर्यंत यूपीआय आज प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
मंडळी, मे महिन्यात यूपीआयद्वारे तब्बल २३ अब्ज २० कोटी व्यवहार करण्यात आले. तर या व्यवहारांचे एकूण मूल्य जवळपास २९ लाख ९० हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यूपीआय सुरू झाल्यापासूनची ही आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे.
एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात व्यवहारांच्या संख्येत सुमारे ४ टक्के वाढ झाली आहे, तर व्यवहारांच्या मूल्यामध्ये ३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दररोज सरासरी ७४ कोटींपेक्षा जास्त यूपीआय व्यवहार होत आहेत. म्हणजेच भारतातील कोट्यवधी नागरिक आता रोजच्या व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात यूपीआयचा वापर करत आहेत.
एकेकाळी रोख पैशांवर अवलंबून असलेला भारत आता वेगाने डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. यूपीआयच्या या नव्या विक्रमाने भारताची डिजिटल क्रांती आणखी मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.





