Latest

अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी अवकाळीने दाणादाण ! ‘या’ तारखेपर्यंत सुरूच राहणार काहूर

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी चांगलीच दाणादाण उडवली आहे. रविवारी रात्री नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अचानक वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. नगर शहरासह जामखेड, नेवासा, कर्जत आणि जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला. रस्त्यांवर धूळ उडाली, काही ठिकाणी पत्रे उडाल्याच्या घटनाही घडल्या. अचानक आलेल्या या बदलामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ३ जूनपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही दिवस विजांचा कडकडाट, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एक महत्वाची बाब म्हणजे, सध्या सुरू असलेल्या या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही.

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या पावसावर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button