Latest

कॉलेजात नावापुरते ऍडमिशन आणि कोचिंगचा खेळ खल्लास ! आता एका क्लिकवर शिक्षण उपसंचालकांना कॉलेजमधील उपस्थिती दिसणार

कॉलेजमध्ये फक्त नावापुरतं अॅडमिशन घ्यायचं आणि दिवसभर कोचिंग क्लासला जायचं, हा प्रकार आता बंद होणार आहे. कारण शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलाय. मंडळी, राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू केली जाणार आहे. त्यामुळे ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवली जाणार असून, ही माहिती थेट शिक्षण विभागाच्या सर्व्हरवर जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेतात, मात्र प्रत्यक्षात ते कोचिंग क्लासेसमध्येच शिक्षण घेतात. काही ठिकाणी महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस यांच्यातील लागेबांधेमुळे केवळ कागदोपत्री हजेरी दाखवली जात असल्याचेही समोर आले होते. याच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमानुसार ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याची उपस्थिती यापेक्षा कमी असेल, तर त्याला बारावीच्या बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

विशेष म्हणजे ही बायोमेट्रिक प्रणाली थेट शिक्षण विभागाच्या मध्यवर्ती सर्व्हरशी जोडली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या महाविद्यालयात किती विद्यार्थी उपस्थित आहेत, याची माहिती शिक्षण उपसंचालक आणि इतर अधिकाऱ्यांना एका क्लिकवर पाहता येणार आहे. या निर्णयाचा नेमका काय परिणाम होतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button