
तुम्ही कधी विचार केला आहे का, कंगवा करताना किंवा केस कापताना जे केस आपण कचऱ्यात टाकून देतो, त्यांची किंमत किती असू शकते? उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या टाकाऊ समजल्या जाणाऱ्या केसांना तब्बल चार हजार रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे.
गावोगावी फिरणारे व्यापारीही आता ‘शंभर ग्रॅम केसांना चारशे रुपये’ अशी घोषणा करत केस खरेदी करत आहेत. त्यामुळे या केसांना आता अनेकजण ‘ब्लॅक गोल्ड’ म्हणजेच काळं सोनं म्हणू लागले आहेत.
केसांना एवढा भाव मिळण्यामागे मुख्य कारण म्हणजे विगची वाढती मागणी. चित्रपटसृष्टी, फॅशन इंडस्ट्री, मॉडेलिंग क्षेत्र यासोबतच टक्कल पडणे किंवा केस विरळ होण्याच्या समस्येमुळे सामान्य लोकांमध्येही विगचा वापर वाढला आहे. भारतीय केसांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे केसाचे अनेक वेगळे उपयोग समोर आले आहेत. मानवी केसांमध्ये केराटिन नावाचे प्रोटीन असते. त्यामुळे केसांपासून सेंद्रिय खत तयार केले जाते. इतकंच नाही, तर समुद्रात खनिज तेलाची गळती झाल्यास ते शोषून घेण्यासाठीही केसांचा वापर केला जातो.
केसांमध्ये तेल शोषून घेण्याची क्षमता जास्त असल्यामुळे जगभरात अशा प्रकल्पांमध्ये त्यांचा वापर वाढत आहे. मंडळी,बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि वाढत्या मागणीमुळे केसांचे अर्थकारण आता नव्या उंचीवर पोहोचले आहे.





