Latest

अहिल्यानगरमधील उपनगरांना उजेडाची गरज ! अंतर्गत रस्त्यांसह अनेक वसाहती दिव्यांविना अंधारात

अहिल्यानगर शहर स्मार्ट होतंय, लोकसंख्या वाढतेय, नवीन वसाहती उभ्या राहत आहेत, पण दुसरीकडे शहरातील अनेक भाग आजही अंधारात आहेत. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

मंडळी, महापालिकेने शहरात सुमारे ३२ हजार स्मार्ट एलईडी पथदिवे बसविले आहेत. या एलईडी दिव्यांमुळे वीजबिलात मोठी बचत झाली असून महापालिकेचा दावा आहे की दरमहा लाखो रुपयांची बचत होत आहे. मात्र शहराचा वाढता विस्तार पाहता हे दिवे अपुरे पडत असल्याचे चित्र समोर आले आहे.

बुरूडगाव रस्ता परिसर, केडगाव, बोल्हेगाव, नागापूर, कल्याण रोड परिसरातील अनेक नवीन वसाहती आणि अंतर्गत रस्ते आजही अंधारात आहेत. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही या भागात पुरेशा प्रमाणात पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत.

अंधाराचा सर्वाधिक फटका महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना बसत आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच अंधाराचा फायदा घेत चोऱ्यांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.

संपूर्ण शहर उजळण्यासाठी आणखी १२ ते १५ हजार एलईडी दिव्यांची गरज असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी ज्या भागात एलईडी दिवे नाहीत, त्या ठिकाणी लवकरात लवकर दिव्यांची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button