
अहिल्यानगर शहरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात समाजकंटकांनी एकाच मालकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या दोन कार पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.
फिर्यादी गौरव कुलकर्णी हे कुटुंबासह घरी झोपलेले असताना रात्री साडेदोनच्या सुमारास त्यांच्या काकांना जळाल्याचा वास आला. खाली पाहिल्यावर घराजवळ पार्क केलेल्या होंडा एक्स्टर कारमधून धूर निघताना दिसला. त्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले.
पहिली आग विझवल्यानंतर गौरव कुलकर्णी यांना अग्निशमन दलाच्या गाडीचा आवाज ऐकू आला. ते तातडीने जुन्या कोर्टगल्ली परिसरात गेले असता त्यांची दुसरी महिंद्रा एक्सयूव्ही ५०० कारही भीषण आगीत जळताना दिसली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले होते.
या दोन्ही घटनांमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Kotwali Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





