
अक्कलकोटच्या दर्शनासाठी निघालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांच्या जीपला बीड शहराजवळ भीषण अपघात झाला. धुळे-सोलापूर महामार्गावरील पांगरबावडी पुलाजवळ शनिवारी सकाळी हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, बायपासवरून जात असताना एका टिप्परने अचानक वळण घेतले. यावेळी टिप्परची जीपला समोरून जोरदार धडक बसली. या धडकेत जीपमधील पाच जण जखमी झाले.
जखमींमध्ये शिवकन्या बडे, नंदा बडे, राणी बडे, अभिषेक बडे आणि गायत्री कचरे यांचा समावेश आहे. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने सर्व जखमींना बीड जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून नंदा बडे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.





