
अहिल्यानगरमधील राज्य वस्तू व सेवाकर म्हणजेच जीएसटी विभागात तब्बल 3 कोटी 87 लाख रुपयांच्या अपहाराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी शासकीय अधिकारी प्रकाश चव्हाण याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणूक आणि सरकारी रकमेच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या अधिकृत युजर आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून व्यापाऱ्यांच्या 44 चलनांमध्ये बेकायदेशीर फेरफार केले.
धक्कादायक बाब म्हणजे, एका पेट्रोलियम व्यापाऱ्याने भरलेली कराची रक्कम आरोपीने स्वतःच्या मुलाच्या ‘नक्ष हॉटेल’च्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप आहे. हा गैरप्रकार 2017 ते 2022 या कालावधीत सुरू होता. या संपूर्ण प्रकारामुळे जीएसटी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरकारी यंत्रणेमधील पारदर्शकता आणि आर्थिक सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





