
मंडळी, यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात प्रशासनाने अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जर तुम्ही वारीत सहभागी होणार असाल, तर ही माहिती नक्की ऐका.
मुंबई वेधशाळेने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्यामुळे देहू आणि आळंदी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली असून चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या भागात जाणे सध्या धोकादायक ठरू शकते.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना देहू किंवा आळंदी येथे गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. त्याऐवजी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून किंवा त्यापुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.
तसेच वारीसाठी निवारा, भोजन, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. वारीला निघण्यापूर्वी हवामान आणि प्रशासनाच्या सूचनांची खात्री करा आणि सुरक्षित प्रवास करा.





