
मंडळी अहिल्यानगरमध्ये सोमवारी मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही पदाधिकारी तेथे पोहोचले.
वाकचौरे यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. पोलिसांना संभाव्य आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी परिसरात बंदोबस्त वाढवला.
शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आणि काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी जाधव यांनी पोलिसांवर सत्ताधाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
ठाकरेंचे कार्यकर्ते वाकचौरेंना काळे फासण्याचे तयारीत होते. पण, पोलिसांनी वेळेवर एन्ट्री घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मात्र, या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, वाकचौरे आणि ठाकरे गटातील संघर्ष पुढेही कायम राहण्याची चर्चा सुरू आहे.





