
कांद्याच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा बिघडले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, १ जूनला कांद्याचा सरासरी किरकोळ भाव २९ रुपये ५० पैसे किलो होता.
१७ सप्टेंबरपर्यंत हाच दर थेट ५३ रुपये ७८ पैशांवर पोहोचला. म्हणजेच अवघ्या साडेतीन महिन्यांत कांद्याच्या किरकोळ दरात ८२ टक्क्यांची वाढ झाली.
घाऊक बाजारातही परिस्थिती गंभीर आहे. जूनमध्ये सरासरी घाऊक भाव २२ रुपये ६० पैसे किलो होता. सप्टेंबरमध्ये तो ४५ रुपयांपेक्षा अधिक झाला.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातून कांद्याचा पुरवठा कमी होणे, उन्हाळी पिकाचे खराब उत्पादन आणि नवीन खरीप कांद्याच्या आवकेत झालेला विलंब, ही दरवाढीची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.
सणासुदीच्या काळातील वाढती मागणी आणि पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतूकही भाववाढीला कारणीभूत ठरते. दर नियंत्रणासाठी सरकार बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उपलब्ध करून देत आहे. मात्र किरकोळ बाजारातील दरवाढीचा फटका ग्राहकांना अजूनही बसत आहे.





