
मंडळी एखाद्या व्यक्तीचा दफनविधी झाल्यानंतर तोच माणूस जिवंत घरी परतला तर ? अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. सोनगाव येथील मतिमंद शब्बीर मन्सूरी मे महिन्यात घरातून बेपत्ता झाला होता.
अनेक दिवस शोध घेऊनही तो सापडला नाही. दरम्यान, एका अज्ञात मृतदेहाची ओळख शब्बीर म्हणून पटवण्यात आली. नातेवाईकांनीही तो शब्बीरच असल्याचे सांगितल्याने शवविच्छेदनानंतर धार्मिक विधीनुसार त्याच्यावर दफनविधी करण्यात आला.
मात्र काही दिवसांनी या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. शब्बीर जिवंत अवस्थेत दुसऱ्या ठिकाणी आढळून आला. एका शेतकऱ्याने त्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नातेवाईकांनी त्याची ओळख निश्चित केली आणि त्याला सुखरूप घरी आणले.
आता सर्वात मोठा प्रश्न असा की, कब्रस्तानात दफन करण्यात आलेला मृतदेह नेमका कुणाचा होता? याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. म्हणून ही घटना सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. पण तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.





