
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण पैसे नाहीत? तर तुमच्यासाठी सरकारकडून मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आलीये.
मंडळी, केंद्र सरकारच्या Stand Up India योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठी खास सुविधा दिल्या जात आहेत. या योजनेत व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल 10 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं.
या योजनेत एकूण प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के रक्कम बँक कर्ज स्वरूपात मिळते, तर उर्वरित 25 टक्के रक्कम अर्जदाराने उभी करायची असते. पण यामध्येही दिलासा देणारी बाब म्हणजे, या 25 टक्क्यांपैकी 15 टक्के सरकार मार्जिन मनी म्हणून देते आणि अर्जदाराला फक्त 10 टक्के स्वहिस्सा भरावा लागतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच हा प्रकल्प नवीन म्हणजेच ग्रीनफिल्ड असावा लागतो. म्हणजेच जुन्या व्यवसायासाठी हे कर्ज मिळत नाही.
उद्योग, व्यवसाय किंवा सेवा क्षेत्रात नवीन उपक्रम सुरू करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कर्जाची मुदतही तब्बल 7 वर्षांपर्यंत दिली जाते.
अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोपी ठेवण्यात आली आहे. तुम्ही Stand Up India च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा थेट जवळच्या बँकेत जाऊनही अर्ज करू शकता.





