
खरीप हंगाम जवळ आलाय आणि त्यासोबतच बियाणे खरेदीची लगबगही सुरू झालीये. मंडळी, पेरणीनंतर बियाणे उगवत नाहीत, उगवण कमी होते किंवा बियाणे बोगस निघते, अशा तक्रारी दरवर्षी समोर येतात. म्हणूनच बियाणे खरेदी करताना काही महत्वाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे बियाणे नेहमी अधिकृत आणि परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करा. बियाण्याची पिशवी घेताना तिची पॅकेजिंग व्यवस्थित तपासा. पिशवी फाटलेली, शिवलेली किंवा संशयास्पद वाटत असेल तर ते बियाणे घेऊ नका. कंपनीचे अधिकृत सील आणि लॉट नंबर आहे का, हे नक्की पाहा.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पेरणीनंतर बियाण्याची रिकामी पिशवी आणि खरेदीचे पक्के बिल कधीही फेकू नका. कारण भविष्यात फसवणूक झाल्यास हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे कायदेशीर पुरावे ठरतात.
तसेच बियाणे थेट पेरण्याआधी १०० दाणे ओल्या कापडावर किंवा गोणपाटावर ठेवावेत. ३ ते ४ दिवसांनंतर जर ७० टक्क्यांपेक्षा कमी दाणे उगवले, तर ते बियाणे वापरणे टाळा.
जर बियाणे बोगस निघाले किंवा फसवणूक झाली, तर घाबरून न जाता थेट तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे लेखी तक्रार करा. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा.





