
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी उपकारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कैद्यांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणासोबत चक्क दारू आणि इतर प्रतिबंधित पदार्थ आढळून आल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मंडळी, राहुरी उपकारागृहातील न्यायालयीन कैद्यांसाठी आहार घेऊन आलेल्या एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कैद्यांना देण्यास मनाई असलेले काही पदार्थ आढळून आले. यावेळी संबंधित व्यक्ती अडखळत बोलत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
गार्ड ड्युटीवरील पोलिस हवालदारांनी तात्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर उपकारागृह प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली असता आहारामध्ये प्रतिबंधित पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित साहित्याचा पंचनामा देखील करण्यात आला.
मात्र या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वीही कैद्यांसाठी आणलेल्या पाण्यात संशयास्पद वास आढळून आला होता. त्याची तपासणी केल्यानंतर तो द्रवपदार्थ दारू असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी उपकारागृह प्रशासनाने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून संबंधित व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





