
अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा सध्या धोक्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील काशी केदारेश्वर मंदिर परिसरातील प्राचीन नागार्जुन गुहा, महादेवाची पुरातन पिंड, दगडी नंदी आणि इतर ऐतिहासिक अवशेषांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
मंडळी, येथील नागार्जुन गुहा ही स्थानिकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. आख्यायिकांनुसार प्राचीन काळात ऋषी नागार्जुन यांनी येथे साधना आणि संशोधन केल्याचे सांगितले जाते.
मात्र अलीकडे या पुरातन अवशेषांच्या अगदी जवळ कथित बेकायदेशीर बांधकाम सुरू करण्यात आल्याचे समोर आले. यामुळे महादेवाची प्राचीन पिंड, दगडी अवशेष आणि इतर ऐतिहासिक खुणांना धोका निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
मंदिर परिसरात वर्षानुवर्षे असलेला सुमारे एक टन वजनाचा भग्न अवस्थेतील दगडी नंदी अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने कारवाई करत सुरू असलेले बांधकाम बंद केले आणि बांधकाम साहित्य जप्त केले. मंडळी, नागलवाडीतील ही घटना केवळ एका गावाची नाही. ग्रामीण भागातील अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक वारसास्थळांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आणणारी आहे.





