
एका महिलेने तब्बल ६९ मुलांना जन्म दिला होता, यावर तुमचा विश्वास बसेल का ? पण हा विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवला गेला आहे. त्यामुळे एक महिला आयुष्यात जास्तीत जास्त किती मुलांना जन्म देऊ शकते? हा सवाल उपस्थित होतोय.
तर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, एका महिलेची प्रजनन क्षमता साधारणपणे वयाच्या १३ ते ५० वर्षांपर्यंत सक्रिय असते. या कालावधीत निरोगी महिला सैद्धांतिकदृष्ट्या १५ ते २० मुलांना जन्म देऊ शकते. मात्र हे तिच्या आरोग्य, गर्भधारणांमधील अंतर आणि वैद्यकीय परिस्थितीवर अवलंबून असते.
पण, जगातील सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा विक्रम रशियातील व्हॅलेन्टिना वासिल्येवा यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल ६९ मुलांना जन्म दिल्याची नोंद इतिहासात आढळते. त्यामुळे त्यांचे नाव जगभर चर्चेत आले.
तथापि, वारंवार गर्भधारणा आणि प्रसूतीमुळे महिलेच्या शरीरावर मोठा ताण येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक प्रसूतीनंतर शरीराला पूर्णपणे सावरण्यासाठी पुरेसा कालावधी आवश्यक असतो.
आजच्या काळात बहुतेक कुटुंबे एक किंवा दोन मुलांनाच प्राधान्य देतात. आरोग्य, शिक्षण, आर्थिक नियोजन आणि जीवनशैलीतील बदल यामुळे कुटुंबाचा आकार लहान होताना दिसत आहे.





