
सुपा एमआयडीसी परिसरात कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याच्या रागातून एका कंपनीच्या एचआर हेडवर जीवघेणा हल्ला आणि लुटमारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा. लि. कंपनीचे एचआर हेड महाडीक यांना रुईछत्रपती फाट्यावर अडवून आरोपींनी बेदम मारहाण केली.
इतकेच नाही तर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत “पुन्हा कामावर येऊ नको” अशी धमकी देत आरोपी फरार झाले. या प्रकरणामागे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा वाद असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर यांच्या सांगण्यावरून हा कट रचल्याचा आरोप असून, वैभव रिकामे याच्यासह काही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून दोन विधीसंघर्षित बालकांना बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. दरम्यान, सुपा पोलिसांनी एमआयडीसीतील सर्व कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली दमदाटी, खंडणी किंवा दबाव टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.





