
अहिल्यानगरसह राज्यात किराणा मालाच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या घरखर्चावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या नऊ महिन्यांत प्रमुख डाळी, साखर, धान्य आणि खाद्यतेलाच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
हरभरा डाळ ८० वरून ९०, तूर डाळ १२० वरून १४०, मूग आणि उडीद डाळ ११० वरून १३० रुपये किलो झाली आहे. मात्र सर्वाधिक धक्का भगर खरेदी करणाऱ्यांना बसला असून तिचा दर ११० वरून थेट २२० रुपये किलोवर पोहोचला आहे.
सोयाबीन तेलही १५० वरून १८० रुपये लिटर झाल्याने स्वयंपाकघराचा खर्च वाढला आहे. साखरेचे दरही ४० वरून ६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
कमी पाऊस, घटलेले उत्पादन, वाढलेला वाहतूक खर्च आणि कच्च्या मालाच्या किमती यामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील सणांच्या काळात डाळी आणि इतर किराणा वस्तू आणखी महागण्याची शक्यता असल्याने गृहिणींची चिंता वाढली आहे.





