Latest

खुशखबर ! मान्सून आज मुंबईत येणार, ‘या’ ७ जिल्ह्यांत मात्र उष्णतेची लाट कायम

महाराष्ट्रासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलीये. तब्बल १४ दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा वेग घेतला असून आज मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मंडळी, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार मान्सूनने रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत मजल मारली आहे. मध्य महाराष्ट्रातही मान्सूनची चांगली प्रगती झाली असून सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, पुणे शहर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड या भागांपर्यंत मान्सून पोहोचला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रातील वातावरणीय स्थितीत सुधारणा झाल्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना बळ मिळाले असून त्याची वाटचाल आता अधिक वेगाने सुरू झाली आहे.

एकीकडे कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असताना दुसरीकडे विदर्भातील नागरिकांना मात्र अजूनही उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. हवामान विभागाने २६ जूनपर्यंत विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये सोमवारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या असून आता विदर्भातील नागरिकांनाही मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे.

मंडळी, आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे मान्सून पुढे किती वेगाने प्रगती करतो आणि राज्यभर चांगला पाऊस कधी सुरू होतो याकडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button