
अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना भंडारदरा पाणलोटातील पावसाने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी रात्रीपासून भंडारदरा परिसरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. रतनवाडी, घाटघरसह पाणलोट क्षेत्रात मुसळधार सरी कोसळल्या. त्यामुळे डोंगर-दऱ्यांमधून धबधबे वाहू लागले, तर ओढे-नालेही खळखळू लागले.
भंडारदरा धरणाची क्षमता ११ हजार ३९ दलघफू असून धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे प्रवरा नदीत तब्बल ३१४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
निळवंडे धरणातही पाण्याची आवक वाढली असून तेथून १४६९ क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडले जात आहे. वाकी तलावातूनही ९८ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
भंडारदरा पाणलोटातील या पावसामुळे भातासह खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र नदीकाठच्या नागरिकांनी वाढत्या पाणीप्रवाहाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





