
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या पीककर्जावर १ एप्रिलपासून कोणतेही व्याज आकारले जाणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मंडळी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत हा निर्णय लागू करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जावर पुढील आदेश येईपर्यंत व्याज आकारू नये.
या योजनेत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी २०१९ मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवर काही अटी होत्या. मात्र आता त्या अटी रद्द करण्यात आल्या असून, पात्र शेतकऱ्यांना २० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमाफीस पात्र असलेल्या सुमारे १ लाख ९२ हजार खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. आता शासनाकडून अंतिम पात्र यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.
कर्जमाफीच्या प्रक्रियेला काही प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला असला, तरी व्याज आकारणी थांबवण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.





