
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र मोहटा देवस्थानच्या व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आलाय. आतापर्यंत देवस्थानच्या अध्यक्षपदी न्यायाधीश कार्यरत होते, मात्र आता ही जबाबदारी धर्मादाय विभागाकडे देण्यात आली आहे.
मंडळी, श्री क्षेत्र मोहटा देवस्थानच्या अध्यक्षपदी अहिल्यानगरचे धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला असून श्री मोहटा देवीचे दर्शन आणि पूजन करून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमात केलेल्या दुरुस्तीनंतर हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी देवस्थानच्या अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधीश महेश लोणे कार्यरत होते, तर पाथर्डी येथील दिवाणी न्यायाधीश विश्वस्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
मात्र नव्या निर्णयानुसार अध्यक्ष आणि विश्वस्त पदांच्या रचनेत बदल करण्यात आला असून देवस्थानच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आता धर्मादाय विभागाकडे सोपवण्यात आली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर नवनाथ जगताप यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच दानपेटी मोजदाद आणि देवस्थानच्या विविध कामकाजाची माहितीही घेतली. या बदलामुळे देवस्थानच्या कारभारात अधिक पारदर्शकता येईल, चुकीच्या गोष्टींना आळा बसेल आणि विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मंडळी, मोहटा देवस्थानच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा प्रशासकीय बदल मानला जात आहे. या बदलानंतर देवस्थानच्या कामकाजात नेमके काय बदल होतात, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.





