
मंडळी यंदा पोळी स्वस्त अन भाकरी महाग अशी स्थिती आहे. ज्वारीचे दर गव्हाच्या दुप्पट झाले असून, सामान्यांच्या ताटावर त्याचा थेट परिणाम दिसू लागला आहे. यंदा ज्वारीचे भाव थेट पाच हजार रुपये क्विंटलवर गेले आहेत.
मंडळी, अहिल्यानगरचा विचहर केला तर जामखेड तालुका ज्वारीचे आगार म्हणून ओळखला जातो. पण गेल्या दोन वर्षांत इथले चित्र बदलायला लागले आहे. शेतकरी आता ज्वारीऐवजी कांदा लागवडीकडे वळत आहेत. कारण ज्वारी काढण्यासाठी मजुरांची टंचाई, वाढलेला उत्पादन खर्च आणि कमी नफा या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचा कल बदलत चालला आहे.
ज्वारी काढण्यासाठी पुरुष मजुरांना सुमारे ८०० रुपये, तर महिलांना ५०० रुपये मजुरी द्यावी लागते. इतका खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. त्यामुळे अनेकांनी ज्वारीची पेरणी कमी केली. दुसरीकडे, लोकांमध्ये ज्वारीच्या भाकरीची मागणी मात्र वाढत आहे. आरोग्यासाठी उपयुक्त असल्यामुळे अनेकजण आपल्या आहारात ज्वारीचा समावेश करत आहेत.
पण उत्पादन कमी आणि मागणी जास्त त्यामुळेच बाजारात ज्वारीचे दर वाढले आहेत. सध्या चांगल्या प्रतीच्या ज्वारीला ४ हजार ते ५३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर नवीन गव्हाला फक्त २ ते ३ हजार रुपये दर मिळतो आहे. म्हणजेच ज्वारी गव्हापेक्षा जवळपास दुप्पट महाग झाली आहे.





