
राज्यात कडक उन्हाने नागरिक हैराण झाले असतानाच आता हवामानात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण उष्ण लाटेनंतर आता वादळी अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. मंडळी, हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागात तर मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर हवामान ढगाळ राहणार असून वादळी पावसाची शक्यता आहे. १९ एप्रिल रोजी घाट परिसर, उत्तर खान्देश आणि दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर २० आणि २१ एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. २२ एप्रिलपासून मात्र या पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.
या अचानक बदलणाऱ्या हवामानाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत आणि पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे कृषी विभागाने शेतकऱ्यांना विशेष आवाहन केले आहे.





