
शेवगावात एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनंतर संतापाची संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात लाट उसळली होती. पण शेवगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला शोधून काढत मोठी कारवाई केली आहे.
शेवगावमधील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला सोहेल राजू शेख नावाचा युवक वारंवार फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून मानसिक तसेच लैंगिक त्रास देत असल्याचा आरोप आहे.
या सततच्या छळाला कंटाळून संबंधित मुलीने 31 मे 2026 रोजी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलीच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपीने बीड, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरसह अनेक ठिकाणी लपण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी त्याचा माग काढत सातारा जिल्ह्यातील वाई येथून त्याला अटक केली. या कारवाईमुळे शेवगाव पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.





