
अहिल्यानगरच्या संगमनेरमधून मुंबईपर्यंतचा यशस्वी प्रवास… पण अचानक आलेल्या या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगले यांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, १४ जून रोजी मुंबईजवळील नालासोपारा येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
संचिता उगले या मूळच्या संगमनेरच्या रहिवासी होत्या. अभिनयाची आवड जपत त्यांनी नगरमधून नाट्य क्षेत्रात सुरुवात केली आणि नंतर हिंदी मालिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
‘कुमकुम भाग्य’, ‘वागळे की दुनिया’ आणि ‘दिलवाली दुल्हा ले जायेगी’ यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तसेच ‘छावा’ चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. एका गुणी, मेहनती आणि आश्वासक अभिनेत्रीच्या अकाली जाण्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.





