Latest

शेतीत पुन्हा बैलांचे दिवस ! महागड्या मशागतीमुळे शेतकऱ्यांचा बैलजोडीकडे कल

खरीप हंगामाची चाहूल लागली आहे आणि शेतकरी मशागतीच्या कामाला लागले आहेत. पण यंदा एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांऐवजी अनेक शेतकरी पुन्हा पारंपरिक बैलजोडीकडे वळताना दिसत आहेत. मंडळी, वाढते इंधन दर आणि ट्रॅक्टरच्या मशागतीचा वाढलेला खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

नांगरणी, वखरणी आणि इतर शेतीकामांसाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने अनेक शेतकरी आता बैलजोडी हा किफायतशीर पर्याय निवडत आहेत. याचा परिणाम थेट जनावरांच्या बाजारात दिसून आला आहे. अनेक गावांमधून शेतकरी बैल खरेदीसाठी बाजारात येत आहेत. विशेषतः खिलार आणि गावरान जातीच्या बैलांना मोठी मागणी आहे.

शेतीत यांत्रिकीकरण वाढलं असलं, तरी वाढत्या खर्चामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अशा परिस्थितीत बैलजोडी त्यांना आधार देत आहे.

विशेष म्हणजे बैल हे केवळ शेतीसाठीच नाही, तर अतिरिक्त उत्पन्नाचेही साधन ठरत आहेत. अनेक शेतकरी स्वतःच्या शेताबरोबरच इतरांच्या शेतातील कामे करूनही उत्पन्न मिळवत आहेत. म्हणूनच, यांत्रिकीकरणाच्या युगातही बैलांचे महत्त्व अजूनही कायम आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button