
विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार आहे. केंद्र सरकारच्या आरटीई कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
मंडळी, राज्यातील दुर्गम वाडी-वस्ती, डोंगराळ भाग, आदिवासी पाडे तसेच घराजवळ शाळा नसलेल्या भागातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा लांब अंतर, प्रवासाचा खर्च आणि पावसाळ्यातील धोके यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणही अर्धवट राहते.
हीच समस्या लक्षात घेऊन वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरातील जवळपास 4 हजार वस्ती शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाने यासाठी काही निकषही निश्चित केलेत. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीपासून एक किलोमीटरच्या परिसरात शाळा नसणे आवश्यक आहे.
सहावी ते आठवीसाठी तीन किलोमीटरच्या आत शाळा नसावी, तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच किलोमीटरच्या आत शाळा नसल्यास या योजनेचा लाभ मिळू शकतो.
महत्त्वाची बाब म्हणजे हा भत्ता थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक मदत मिळणार असून विद्यार्थ्यांचे शिक्षणही अखंड सुरू राहणार आहे. मंडळी हा निर्णय तुम्हाला कसा वाटला?





