
अन्नामध्ये भेसळ, औषधांमध्ये भेसळ आणि जनतेच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ आता अहिल्यानगर जिल्ह्यातील एक गाव पुढे सरसावलं आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण ग्रामसभेत नुकताच एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावातून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट विनंती केली आहे की, तुकाराम मुंडे यांची बदली करू नये आणि त्यांना किमान तीन वर्षे या पदावर काम करण्याची संधी द्यावी.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दूध, खवा, पनीर, थंड पेये आणि औषधांमधील भेसळीविरोधात धडक कारवाई सुरू केली.
या कारवाईमुळे अनेकांना धास्ती बसली, पण सर्वसामान्य नागरिकांना मात्र दिलासा मिळाला.”जो अधिकारी जनतेच्या आरोग्यासाठी लढतो, त्याला पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे,” अशी भावना ग्रामसभेत व्यक्त झाली. त्यामुळेच गावकऱ्यांनी राजकारण किंवा दबाव बाजूला ठेवत एकमुखाने मुंडे यांच्या समर्थनाचा ठराव मंजूर केला.
आज जेव्हा अनेकजण व्यवस्था बदलण्याची अपेक्षा करतात, तेव्हा एखादा अधिकारी प्रत्यक्ष कारवाई करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असल्याचा संदेश देवदैठण ग्रामस्थांनी या ठरावातून दिला आहे.





