
कोपरगाव शहर पोलिसांनी नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर मोठी धडक कारवाई करत तब्बल १८ टन गोमांस आणि दोन कंटेनर जप्त केले आहेत. या कारवाईत एकूण ५० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुरुवारी समृद्धी महामार्गाच्या पुलाखालून संशयास्पद कंटेनर जात असल्याची माहिती गोरक्षकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत दोन्ही कंटेनर अडवले. तपासात पहिल्या कंटेनरमध्ये १२ टन तर दुसऱ्यामध्ये ६ टन गोमांस आढळून आले.
या प्रकरणी राजकुमार यादव (वय ३३) आणि प्रतापसिंग सिंग, दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी, यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता कोपरगाव शहर पोलीस हे गोमांस कुठून आणले गेले आणि कुठे पाठवले जाणार होते, याचा सखोल तपास करत आहेत.





