Explained

Ahilyanagar Crime | लहान लेकरांसमोरच आईवर अत्याचार, नगर हादरलं

सुसंस्कृत समजला जाणाऱ्या पारनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून महिला व मुलींवरील अत्याचार वाढले आहेत. पारनेर गेल्या काही वर्षांपासून एवढं असुरक्षित का झालं? हा प्रश्न पडतोय. पारनेरच्या स्थानिक लोकप्रतिनधींनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत पाच ते दहा गंभीर अत्याचाराचे प्रकार उघड झाल्याने महिला व मुलींबमध्ये दहशत निर्माण झाली आहे. महिला व मुलींना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. बुधवारी रात्री पारनेर तालुक्यातील मस्केवाडी परिसरात, आणखी एक गंभीर घटना उघडकीस आली. आपल्या लहान मुलांसोबत मेंढ्यांच्या कळपासोबत झोपलेल्या, एका मेंढपाळ महिलेवर एका नराधमाने जबरी अत्याचार केला. अर्थात पारनेर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या नराधमाला अटक केली परंतु या घटनेमुळे महिला व मुलींमधील दहशत आणखी वाढली. नेमकं काय चाललंय पारनेरमध्ये? याच विषयाचा हा स्पेशल रिपोर्ट…

बुधवारी 20 मे रोजी रात्री पारनेर तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला. तालुक्यातील म्हस्केवाडी परिसरात एक मेंढपाळ महिला आपल्या लहान मुलांसोबत मेंढ्यांच्या कळपात झोपली होती. त्यावेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन संशयीत आरोपी सुभाष संतोष शेंडगे याने या महिलेला धमकी देत तिच्यावर जबरी अत्याचार केला. जिवे मारण्याच्या धमकी दिल्यानंतर ही असहाय महिला या नराधमाचा प्रतिकार करु शकली नाही.

आरोपी शेंडगे हा मुळचा निघोज येथील काळेवस्तीवरील राहणारा असला तरी तो सध्या म्हस्केवाडी येथे आला होता. याच दरम्यान त्याने पाळत ठेऊन हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, हा नराधम अत्याचार करत होता, त्यावेळी पिडीत महिलेची लहान मुले तिच्याजवळच झोपलेली होती. मुलांसमोरच आपल्या आईला तिची इज्जत गमवावी लागली. ही घटना अति गंभीर होती. माणुसकीला काळिमा फासणारी होती.

घटनेनंतर या पिडीतेने तत्काळ पारनेर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल केला. पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आपल्या टीमला मार्गदर्शन केले. त्यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा माग काढण्यासाठी रवाना केले. या पथकाने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारावर अवघ्या २४ तासांच्या आत नराधम आरोपी सुभाष शेंडगे याला जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी गांभीर्य ओळखून अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक केली असली तरी, नराधमांची असे प्रकार करण्याची हिंम्मत कशी होते, हाच खरा प्रश्न आहे.

पारनेर तालुक्यात गेल्या चार-पाच महिन्यांत महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. लैंगिंक शोषण, शारीरीक छळ, बदनामीची धमकी देऊन बलात्कार, विनयभंग या गंभीर प्रकारचे तब्बल 10 पेक्षा जास्त गुन्हे घडले आहेत. मार्च महिन्यांत दोन सख्य्या अल्पवयीन बहि‍णींवर अत्याचार करण्याचा प्रकार उघड झाला. 15 व 13 वर्षे वयाच्या दोन सख्या बहि‍णींवर पाच नराधमांनी अत्याचार केला. मुलींच्या पालकांनी यासंरदर्भात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. त्या प्रकरणात प्रसाद साळवे, अनिल साळवे, विशाल हुलावळे, प्रथमेश लोंढे, शुभम आल्हाट, रोहित चत्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्याच महिन्यात पारनेर तालुक्यातील ढवळपूरी येथील दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आणि किर्तनकार यशवंत एकनाथ थोरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिच्या मांडीला चटके देण्याचा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे हा महाराज या मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार करत होता. म्हणजेच मुलगी जेव्हा अवघी 12 वर्षांची होती, तेव्हापासून ती नराधम महाराजाच्या वासनेला बळी पडली होती.

याशिवाय महिलांचे विनयभंग, पाठलाग, छेडछाड हे प्रकारही नित्याने घडलेत. पारनेरमध्ये हे सगळं काय चाललंय, हेच सामान्यांच्या समजण्यापलिकडं गेलंय. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत कडक पावले उचलली असली तरी हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याने चिंता वाढलीय. अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती आणि पोलीस गस्त वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले जात असले तरी आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकारांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button