
अष्टविनायक भक्तांसाठी, अष्टविनायकांच्या दर्शनास जाणाऱ्या भाविकासांठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.. मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील मंदिरे ९ जून २०२६ पर्यंत भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
मंडळी, अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली या मंदिरांमध्ये जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कामांमध्ये मंदिरांचा गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. त्यामुळे काम सुरळीत पार पडावे आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी भाविकांची गर्दी टाळणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, मंदिरांमध्ये नित्य पूजाअर्चा आणि धार्मिक विधी नियमित सुरू राहणार आहेत. मात्र या काळात भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही, तसेच मंदिर परिसरात प्रवेशही दिला जाणार नाही. ही कामे मंदिरांची दीर्घकालीन सुरक्षितता आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत महत्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंडळी, जर तुम्ही अष्टविनायक दर्शनाची योजना करत असाल, तर ही माहिती लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे.





