
भोंदू खरात प्रकरणातील एसआयटी पथकाच्या तपासातून दररोज काही ना काही नवीन माहिती समोर येत आहे. एसआयटी चौकशीतून हाती आलेल्या नव्या माहितीनुसार, खरातने पुणे येथील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकालाही गेल्या पाच वर्षांपासून जादूटोणा आणि तंत्रमंत्राच्या साहाय्याने चुना लावलाय.
व्यवसायात भरभराट करण्याचे आमिष दाखवून त्या मोठ्या बिल्डरला खरातने तब्बल ४ ते ५ कोटी रुपयांना लुटल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून खरातने केवळ पैसेच उकळले नाहीत, तर दबाव आणून महागडी मर्सिडीज कार सुद्धा गिफ्ट करायला लावली आणि मर्सिडीज कार स्वतःच्या नावावर करून घेतली.
धक्कादायक बाब म्हणजे, खरातने या बिल्डरसोबत विविध देशांचे परदेश दौरेही केले होते. म्हणून पोलिसांनी ही फक्त फसवणूक नसून खंडणी होती असा दावा केलाय. दरम्यान, खरातची सध्याची पोलीस कोठडी उद्या संपणार असून, गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस न्यायालयासमोर कोणती नवी भूमिका मांडतात आणि त्याची कोठडी वाढवून मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





