
रात्री उशिरापर्यंत जागणे किंवा कामाच्या धावपळीत झोप कमी घेणे आरोग्यासाठी महागात पडू शकते. कारण सलग पाच रात्री पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास शरीराच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.अपुऱ्या झोपेमुळे शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही.
त्यामुळे रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचण्याची प्रक्रिया प्रभावित होते आणि साखरेची पातळी वाढू शकते.इतकेच नाही, तर झोप कमी झाल्यामुळे भूक आणि तणाव नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्समध्येही बदल होतात. परिणामी गोड पदार्थ, तळलेले पदार्थ आणि जास्त कॅलरी असलेले अन्न खाण्याची इच्छा वाढू शकते. मधुमेह किंवा प्री-डायबेटिस असणाऱ्यांसाठी ही बाब अधिक महत्त्वाची आहे.
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी काय कराल?
१. दररोज ७ ते ९ तास झोप घ्या.
२. झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा.
३. संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.
४. संध्याकाळनंतर चहा-कॉफीचे सेवन कमी करा.
५. रात्री झोपण्यापूर्वी जड जेवण टाळा.
६. रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा.
लक्षात ठेवा, अपुरी झोप हे मधुमेहाचे एकमेव कारण नाही; मात्र ती रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडवू शकते. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आहाराइतकीच पुरेशी झोपही महत्त्वाची आहे.





